‘भाजपच्या वटवृक्षाला बांडगुळे चिटकू नयेत’, राणेंवर अप्रत्यक्ष टीका

सिंधुदूर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदूर्गाने विधानसभा निवडणूकीचे लक्ष वेधले आहे. या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांमध्ये युती तुटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या मुलाच्या नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने आपल्या उमेदवाराला एबी फॉर्म देऊन अर्ज भरला. वातावरण आणखी तेव्हा तापले जेव्हा आधीच भाजपवासी झालेले माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.

स्वाभिमानीचे सतीश सावंत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात बंड करत पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर शिवसेनेत प्रवेश करुन एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केली. नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संदेश पारकर यांनी कणकवली देवगड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

संदेश पारकर यांनी आज फेसबूकवर पोस्ट करत त्यांचे बंडखोरीचे कारण सांगितले. अन्यायाविरोधात लढणे हा माझा स्वभाव आहे. माझी गेल्या 25 वर्षांची कारकीर्द फक्त कणकवलीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने पाहिली. भारतीय जनता पक्ष हा वटवृक्ष आहे, आमच्यासारख्या पारंब्या त्याचा विस्तार कसा आणि किती वाढवणार, हा प्रश्नच आहेच. पण या वटवृक्षाला बांडगुळे चिकटू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र काही जिल्ह्यातील काही खुज्या नेत्यांमुळे ही बांडगुळे भारतीय जनता पार्टी नावाच्या वटवृक्षाला चिकटू पाहत आहेत असा आरोप त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि नारायण राणे यांच्यावर नाव न घेता केला.

पुढे संदेश पारकर यांनी लिहिले की, या गुंडापुंडांची पोलखोल करण्यासाठी, त्यांच्या नादाला लागून मारामाऱ्या करणाऱ्यांचे हात रोजगाराला लावण्यासाठी आपण विधानसभा लढणार आहे. तसेच संदेश पारकर ना साहेब झाला, ना नेता झाला. त्याची मालमत्ता एक चौरस फुटानेही वाढलेली नाही. त्याच्या नावावर कुठलेही कंटेनर थिएटर नाही. त्याच्या म्युझियमचे भाडे थकलेले नाही, अशी घणाघाती टीकाही पारकर यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून केली.

Visit : Policenama.com