‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरांना शांत करण्यात ‘सेने’ला अपयश

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाली असून बंडखोरांना शांत करण्यात दोन्ही पक्षांचा आजचा दिवस जाणार आहे. असे असताना दस्तरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील बंडखोरांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली असून त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र, त्यांनी दबाव झुगारून बंडखोरी कायम ठेवली आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आज उमेदवारी अर्ज मागे घण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तृप्ती सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले होते. परंतु सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना देखील न जुमानता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

तृप्ती सावंत या शिवसेनेचे आमदार बाळा सावंत याच्या पत्नी आहेत. बाळा सावंत हे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रसचे नेते नारायण राणे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, सहानभुतीच्या लाटेवर तृप्ती सावंत यांनी राणे यांचा पराभव केला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारून विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज तृप्ती सावत यांनी बंडखोरी केली.

Visit : Policenama.com