विधानसभा 2019 : ‘युती तोडण्याचे काम शिवसेनेनं केलं, शेवट भाजप करणार’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यात युती झाली असताना कोकणात मात्र भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार आहे असा इशारा माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. तसेच भाजप युती 2024 मध्ये तुटणार असून त्याची नांदी ही कणकवलीतून झाली असल्याचे म्हटले.

भाजप नेते संदेश पारकर व अतुल रावराणे यांनी पुढील दोन दिवसांत नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी व्हावे अन्यथा पक्षाचा सरळ राजीनामा द्यावा. नाहीतर त्यांची ना इलाजाने हकालपट्टी करावी लागेल असेही जठार यांनी म्हटले आहे. तसेच नाणार प्रकल्पाला भविष्यात राणे यांचा विरोध असणार नाही त्याच अटीवर पक्षात घेण्यासाठी मी हिरवा कंदील दिल्याचे जठार यांनी सांगितले. राणेंचा भाजप प्रवेश हा शिवसेनेमुळे रखडला होता. आता ते रीतसर भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे कोकणात भविष्यात भाजप हाच एक नंबरचा पक्ष असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज शिवतिर्थावर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कुडाळ आणि कणकवली येथून विजयाची सुरवात होईल असे म्हटले. तसेच गद्दारी करणाऱ्या आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदार योग्य जागा दाखवतील. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, शिवसेना संपवण्याची भाषा केली अशांना जनता माफ करणार नसल्याचे सांगत संजय राऊत यांनी राणे यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या ठिकाणी मतदार कोणाला कौल देणार हे निकालानंतर समजेल.

Visit : Policenama.com