‘होय, आमचं पवारांशी बोलणं झालं’, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालेला असताना संजय राऊत हे सातत्याने शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहेत. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यासाठी लवकरच उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

सरकार स्थापनेविषयी संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या सरकारच्या स्थापनेमध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात स्थिर सरकार यावं ही सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे राज्यपालांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. ‘

शरद पवारांच्या भेटीविषयी संजय राऊत म्हणाले की, ‘शरद पवार देशाचे मोठे नेते, ते मुख्यमंत्री होतील ही अफवा आहे. शरद पवारांना भेटलो, बोललो तर गुन्हा आहे का? ज्यांना पवारांशी बोलण्याचा पोटशुळ उठला आहे. ते देखील त्यांच्याशी कसा संपर्क साधतात हे आम्हाला माहित नाही. दिल्लीत काय झालं याची माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं आम्हाला पडलं नाही. राजकारणात चर्चा होत असते. शरद पवारांशी माझं बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण विधी होऊन महाराष्ट्रातील ग्रहण सुटणार आहे.’

शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा मागितला असून मुख्यमंत्रीपदावरही अडीच वर्षांसाठी दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. सोमवारी राऊत यांनी राज्यपालांचीही सदीच्छा भेट घेतली.

Visit : Policenama.com