युतीचा पोपट मेलाय ? फक्त जाहीर कोणी करायचं हे राहिलय !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अखेर न सुटल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर आता महाशिवआघाडीची तयारी सुरु झाली असून राज्यात नवीन सत्ता समीकरणे तयार होऊ शकतात. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले असून ते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेने केंद्रातील त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा दिला असून ते युतीतून बाहेर पडले आहेत, मात्र त्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी देखील राजीनामा देतेवेळी याचे कारण सांगितले नव्हते. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेच्या वतीने देखील यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील यासंदर्भात आतापर्यंत उडवाउडवीचीच उत्तरे दिली आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयी भाष्य करताना म्हटले आहे कि, युतीचा पोपट मेलेला आहे मात्र घोषणा कुणी करायची हा प्रश्न राहिला आहे. त्यामुळे आता हे पाप कोण डोक्यावर घेतो याची दोन्ही पक्ष वाट पाहत आहेत. त्याचबरोबर आम्ही सर्वजण मिळून चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज्यपालांनी आमंत्रण दिलेल्या तिन्ही पक्षांनी सरकारस्थापनेचा दावा न केल्याने आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून कमीत कमी पुढील सहा महिन्यांपर्यंत हि राजवट लागू असणार आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com