शिवसेनेला गंभीर ‘परिणाम’ भोगावे लागतील, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा ‘इशारा’

वाराणसी : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विन चौबे यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनता सर्व पाहत आहे. सत्य काय आहे हे त्यांना समजतं. आज नाही तर उद्या याचे गंभीर परिणाम शिवसेनेला भोगावे लागणार, असा इशारा चौबे यांनी दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विन चौबे हे एका कार्यक्रमासाठी वाराणासीला आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेने जो कौल दिला तो महायुतीला मिळाला होता. शिवसेनेने महायुतीच्या धर्माचं पालन करणं गरजेचे होतं. मात्र, त्यांनी तसे केले नाही असे चौबे म्हणाले. तसेच शिवसेनेच्या हिदुत्वाच्या मुद्यावर बोलताना कोण कोणाला शिकवणार हे सर्व माहित आहे. सत्तेच्या लालसेपोटी अशाप्रकारे भाजपने कधीही पावलं उचलली नाहीत असे चौबे यांनी सांगितले.

दरम्यान, शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्यापेक्षा भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन करावी. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घेऊन एकत्र सरकार चालवावे. मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपने दीड वर्षासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन तडजोड करावी असे रामदास आठवले यांनी आवाहन केले आहे.

Visit : Policenama.com