छ. संभाजीराजेंनी सांगितला ‘उत्तम’ पर्याय, म्हणाले – ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तास्थापनेवरून राज्याच्या घडणाऱ्या घडामोडींवर खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली याविषयी बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जातोय, अनेक कारणांमुळे युवक नैराश्यात आहेत, अनेक प्रश्न राज्यसमोर आ वासून उभे असताना, ही राजकीय अस्थिरता परवडणारी नाही तसेच हा सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढावा. व स्थिर सरकार स्थापन करुन लोकाभिमुख राज्यकारभार करावा. ‘

भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर राज्यपालांकडून शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली त्यांनीही असमर्थता दर्शवल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली .

Visit : Policenama.com