राज्याला 20 नोव्हेंबर पुर्वी ‘नवा’ मुख्यमंत्री मिळणार !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत असून लवकरच यावर निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये भेट होणार असून 16 नोव्हेंबर रोजी हि भेट होणार आहे. त्यामुळे 17 ते 20 यादरम्यान नवीन सरकार स्थापण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली असून यामुळे त्यांनी भाजपपासून फारकत घेतली आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहाय्याने शिवसेना आपला मुख्यमंत्री बसवणार असून यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या जोरदार बैठका सुरु आहेत. यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला जात असून यामध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे नक्की आहे. राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक हे तिघेजण चर्चेसाठी असून काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे हे नेते चर्चेसाठी आहेत. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे चर्चेसाठी आहेत. राज्यात सध्या शेतकरी संकटात असून त्यांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेत असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या जनतेला निवडणुकीचा भार नको आहे.

दरम्यान, तिन्ही पक्षांमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला असून लवकरच मंत्रिपदाचे वाटप देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सत्ता कधी स्थापन होते याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com