चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांची ‘हॅटट्रीक’, बंडखोर कलाटे यांची कडवी झुंज अयशस्वी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी ‘हॅटट्रीक’ केली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांना कडवी लढत दिली. ३८ हजार ४९८ मताधिक्क्याने जगताप यांचा विजय झाला आहे. लक्ष्मण जगताप यांना १ लाख ५० हजार २३ मते मिळाली. तर अपक्ष राहुल कलाटे यांनी १ लाख १२ हजार २२५ मते मिळाली.

चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळाली. त्यांच्यासह ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा हा मतदार संघ आहे. याठिकाणी २ लाख ७६ हजार ६६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदानाची ही टक्केवारी ५३.३८ आहे.

या मतदार संघात ४९१ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. २२ टेबलवर मतमोजणीच्या एकूण २३ फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीपासून जगताप व कलाटे यांच्यामध्ये पाठशिवणीचा खेळ पहायला मिळाला. अपक्ष असूनही कलाटे यांनी जगतापांना चांगलाच घाम फोडल्याचे पहायला मिळाले. सातव्या फेरीपासून जगतापांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर जगतापांचे थोडेथोडे मताधिक्य वाढत असल्याचे पहायला मिळाले. जगताप यांच्या दीड लाखांच्या मताधिक्याचा दावा कलाटे यांनी खोडून काढत त्यांना चांगलीच टक्कर दिली.

Visit : Policenama.com