आमदारांच्या बैठकीत मोठा ‘खुलासा’ ! उध्दव ठाकरे ‘मुख्यमंत्री’ होणार नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावा करण्यात येत आहे की राज्यात लवकरच आपले सरकार स्थापन होईल. आता आघाडीने तयार केलेल्या फॉर्म्युल्यावर आज शिवसेनेशी चर्चा करुन सर्वकाही निश्चित करण्यात येईल. यात फॉर्म्युल्यानुसार पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की आता चर्चा रंगली आहे ती मुख्यमंत्री कोण याबाबत. यात सर्वात आघाडीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव आहे. परंतू शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आणि त्यांना दिलेल्या वचनानुसार स्वत: उद्धव ठाकरेंनी आपलं नाव यातून काढून घेतल्याचे समजते आहे.

शिवसेनेसोबत जाण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आता अंतिम स्वरुपासाठी तो शिवसेनेसमोर ठेवण्यात येईल. आज याच पार्श्वभूमीवर आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली, परंतू मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास उद्धव ठाकरे तयार नसल्याचे समजते.

शिवसेनेच्या बैठकीतील उपस्थित नेत्यांनी सांगितले की उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली आहे की राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असे वचन मी त्यांना दिले होते. त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री होणे योग्य ठरणार नाही. याबाबत थोडी वाट पाहण्याचे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत होणाऱ्या आजच्या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्विकारतील याची शक्यता कमी वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेत इतर नेत्यांच्या नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरु झाली आहे. अनेक आमदारांची एकनाथ शिंदे यांना पसंती आहे. परंतू आता आणखी एका नेत्याची चर्चा सुरु आहे. ते म्हणजे शिवसेनेची सडेतोड भूमिका मांडणारे संजय राऊत. शरद पवारांनी संजय राऊत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय सुभाष देसाई यांचे नाव देखील चर्चेत आहे.

उद्धव ठाकरेंची पसंती अजूनही फक्त पक्ष प्रमुखपदालाच आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास पक्षाच्या संघटनेची जबाबादारी कोण संभाळणार हा महत्वाचा विषय आहे. राज्यात पक्ष वाढवण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून सक्षमपणे करण्यात आले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख म्हणून ते ती जबाबदारी सक्षमपणे संभाळू शकतात.

सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय आता अंतिम टप्यात आहे, त्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे, या सर्व आमदारांना एकत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमदारांना जयपूरला हलवणार अशी चर्चा होती. मात्र मुंबईतच आमदारांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली आहे.

Visit : Policenama.com