सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी घेतली भाजपाची ‘फिरकी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आयोध्या प्रकरणाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने आयोध्येमध्ये राम मंदिर होणार हे आता निश्चित झाले आहे. आयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपची फिरकी घेतली आहे. आयोध्येत राम मंदिर तर महाराष्ट्रात सरकार, जय श्री राम असं ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

आयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. मागली अनेक वर्षापासून राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. तसेच राम मंदिर उभारणीसाठी अनेक कार्य़क्रम हाती घेतले होते. स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शरयु नदीच्या किनारी महाआरतीचे आयोजन केले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पहले राम मंदिर फिर सरकार असा नारा त्यांनी दिला होता. तसेच या आशयाचे फलक देखील झळकले होते.

पहले राम मंदिर फिर सरकार या बॅनरची चर्चा सुरु झाली होती. लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजपने युती करुन लढवली होती. त्यावेळी राम मंदिराच्या बॅनर्सवरून अनेकांनी शिवसेनेची खिल्ली उडवली होती. मात्र, राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे आणि इतके वर्ष रखडलेल्या आयोध्या प्रकरणाच्या निकालामुळे शिवसेना योग्य वेळ साधत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच राम मंदिर आणि महाराष्ट्र सरकार अशी प्रतिक्रीया दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

आयोध्येतील एका प्रकरणावर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही खटला चालला, गुन्हा दाखल झाला. मागील वर्षापासून मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. हे आंदोलन एका पक्षाचे नाही तर यामध्ये सर्वपक्षाचे लोक होते. राम मंदिराच्या अध्यादेश आणावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पहा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सांगितले होते. त्याप्रमाणे आज निर्णय झाला, तो निर्णय सर्वांना मान्य करायला हवा. हा निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे, सरकारचा नाही असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

Visit : Policenama.com