EC वर आरोप, महाराष्ट्र निवडणुकीत BJP च्या IT ‘सेल’कडे सोपविण्यात आली ‘सोशल मीडिया’ची जबाबदारी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचा दावा करणारा निवडणूक आयोग आता पक्षपात आणि डेटा लीकच्या महत्त्वाच्या प्रश्नांनी आणि गंभीर आरोपांनी वेढलेला दिसून येत आहे. निवडणूक आयोगावर आरोप आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आयटी सेलकडे देण्यात आली होती, अर्थात आयोगाकडे असलेल्या डेटाकडे कोणत्या तरी अशा खासगी कंपनीचा प्रवेश होता जी स्पष्ट आणि जाहीरपणे राज्यातील तत्कालीन सत्ताधारी पक्षाशी संबंधित होती.

सोशल मीडिया हँडल व राजकीय पक्षांच्या पृष्ठांवर बारीक नजर ठेवणे हे निवडणूक आयोगाचे कार्य होते. परंतु स्वत: आयोगाची सोशल मीडिया हँडल्स, वेबसाइट्स, पृष्ठे आणि डेटा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या व्यावसायिक अधिकाऱ्यांकडे तारण ठेवलेले होते. आयोगाच्या डोळ्यात बोट घालून दाखविल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी हालचाली तीव्र करण्यात आल्या आहेत.

आपल्या स्वतंत्र आणि निष्पक्ष असल्याचा दाव्यांवर उठणाऱ्या प्रश्न आणि आरोप-प्रत्यारोपांवर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उत्तर मागितले आहे. आयोगाच्या प्रवक्त्याला याबाबत आणि त्यांच्या ट्विटबाबत विचारले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबत सांगितले जाईल असे स्पष्ट केले.

तथापि, धक्कादायक खुलासा म्हणजे सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या जन जागरण मोहिम आणि संपूर्ण निवडणूक अभियानावर नजर ठेवण्याचे काम ज्या कंपनीला व व्यक्तीला देण्यात आले होते, ते भाजपाचे युवा संघटना बीजेवायएम म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी सेलचे संयोजकही आहेत. त्यांचे नाव देवांग दवे असे असून त्यांची कंपनी सोशल सेंट्रल मीडिया सोल्यूशन एलएलपी ही आहे.

आयोगाला द्यावे लागेल उत्तर

निवडणूक आयोगाने आपल्या सोशल मीडिया हँडल आणि पृष्ठावर तोच पत्ता लिहिला होता जो कंपनी आणि त्या व्यक्तीचा होता. सोशल सेंट्रल मीडियाच्या ग्राहकांच्या यादीमध्ये भाजपा आणि स्वतः महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला हे देखील स्पष्ट करावे लागेल की त्यांची वेबसाइट, मीडिया हँडल, पृष्ठ, त्यावरील जाहिरातीचा पत्ता 202 प्रेसमन हाऊस, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई. म्हणजेच, भाजपा आणि आयोगाच्या देखील सोशल नेटवर्किंगकडे पाहणारी कंपनी तीच का आहे!

माजी पत्रकारांनी उपस्थित केला प्रश्न

माजी पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते आणि कॉंग्रेस पक्षाचे समर्थक साकेत गोखले यांनी ट्विटरच्या थ्रेड मध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे. गुरुवारी संध्याकाळी पोस्ट केलेल्या ट्विटर थ्रेडमध्ये गोखले यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या काही जाहिराती पाहताना लक्षात आले की त्या पत्त्यात मुंबईतील विलेपार्ले येथील कार्यालयाचा पत्ता आहे.

ते म्हणाले, ‘पत्ता 202 प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई असा होता. तो कोणाचा पत्ता आहे हे शोधण्याचे मी ठरविले. हा साइनपोस्ट इंडिया नावाच्या एका जाहिरात कंपनीचा निघाला, जी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारच्या अखत्यारीत येणारी एक सरकारी संस्था होती.’ त्यांनी अजून पुढील एका ट्विटमध्ये म्हटले की, ‘पण थांबा – ही गोष्ट पूर्ण झालेली नाही. 202 प्रेसमन हाऊसचा पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या एका डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला. ही एजन्सी देवांग दवे यांच्याकडे आहे, जे भाजपा युवा संघटना बीजेवायएमचे आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.’

देवांग दवे यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे

या आरोपांवर देवांग दवे म्हणतात की माझ्या प्रतिष्ठेला डाग लावण्याच्या हेतूने हे पूर्णपणे निराधार आरोप केले गेले आहेत कारण मी अत्यंत मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलो आहे. माझ्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मी पुढे जात असताना काही लोकांना ते पाहवत नाही आणि त्यामुळे मला लक्ष्य केले जात आहे. मी कायदेशीर कारवाई करेन.

या दरम्यान, साकेत गोखले यांनी केलेल्या आरोपांबाबत भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता हे पाहणे उत्साही ठरणार आहे की हा खुलासा झाल्यानंतर सीईओ महाराष्ट्राचे कार्यालय आपल्या बचावात कोणती कहाणी सांगेल.