आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो तर अजित पवार…., देवेंद्र फडणवीसांचा मोठा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं मिळून सरकार स्थापन होणार यावर  शिक्कामोर्तब झाला असतानाच अचानक नाट्यमय घडामोडी घडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.  देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांना बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा द्यावा लागला. या घटनेविषयी राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते असा खुलासा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिन्याभरातील राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना  देवेंद्र फडणवीस म्हणाले की , ‘शपथविधीच्या आधी 2 दिवस अजित पवारांबरोबर चर्चा झाली होती. आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते. 23 नोव्हेंबरला जो शपथविधी झाला त्याआधी अजित पवार यांनी आमच्याकडे येऊन सांगितले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत मिळून तीन पक्षाचे सरकार जास्त काळ टिकणे शक्य नाही आणि राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. ते सरकार फक्त भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास देता येऊ शकते कारण त्यांच्याकडील आमदारांचा आकडा मोठा आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसोबत चर्चा करून दिली. आम्ही त्यांच्याबरोबर जायला हवं की नको यावर वाद होऊ शकतात, पण त्या वेळी तो गनिमी काव्याचा डाव होता, असं म्हणता येईल. पण तो डाव फसला. ‘

निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती.  त्यामुळे बहुमत असूनही  युतीची सत्ता स्थापन न होता काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून सरकार बनवले.
Visit : Policenama.com