महाराष्ट्रात युतीला ‘एवढ्या’ जागा फिक्स ; रावसाहेब दानवेंचा ठाम विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचा निकाल अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना आता अवघ्या देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. राजकीय तज्ञांनी आणि माध्यमांनी एक्झिट पोल नुसार देशात भाजप कडे जनतेचा कौल असेल असा अंदाज वर्तवला आहे. असे असताना महाराष्ट्राच्या ४८ जागांपैकी ४२ जागांवर भाजप पक्ष निवडून येईल असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले, “मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिले, कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता. महाराष्ट्रात आम्हाला ४२ च्या वरच जागा मिळतील ४१ सुद्द्धा होणार नाहीत. आजपर्यंतचा अभ्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ६ आणि ४ या आकड्यांच्या वर गेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळून राज्यात ५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा मला विश्वास आहे. असे दानवे म्हणाले. ”

विधानसभेला देखील एकत्र लढा देऊ

यावेळी बोलताना भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असे काम केले. आता तर ते जुळे भाऊ झाले आहेत अशी प्रतिक्रिया उमटत आहेत यावर बोलताना दानवे म्हणाले, “प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदी उभे होते, असं शिवसेना-भाजपने एकत्र काम केलं. त्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ असं काही नाही. आम्ही विधानसभेला पण एकत्र लढा देऊ.” असे दानवे म्हणाले.