अंबरनाथ येथील बिस्किट कंपनीला भीषण आग

अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्किट कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली आहे. आर के १ नावाच्या बिस्किट कंपनीला ही आग लागली आहे. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास कंपनीच्या एका शेडमध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने अन्य शेडमध्ये पसरली. संपूर्ण कंपनीला आगीचा वेढा पडला असून आगीच्या ज्वाळा सर्वत्र दिसून येत आहे. आकाशात धुरांचे लोळ पसरलेले दिसत आहे.

अंबरनाथ पालिकेचे २ बंब तसेच ठाणे आणि अंबरनाथ एमआयडीसीचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढलेले दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली होती. हिंगणा एमआयडीसी परिसरातील विको कंपनीला रविवारी रात्री आग लागली होती.