स्वच्छतेत महाराष्ट्र देशात प्रथम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशभरात महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छतेच्या पर्वाला नवी सुरूवात केली अाहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री अशा 70 जणांची परिषद भरली होती. त्यात महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावत तीन पारितोषके मिळविली, असा दावा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला.

कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील जंगलीदास माऊली आश्रमास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोणीकर म्हणाले की,  स्वच्छतेचे महत्व तळागाळातील जनतेला पटवून देण्यासाठी राज्यातील 600 कीर्तनकार, प्रवचनकार, साधू, संत-महंतांना मुंबईत बोलावून त्यांना याबाबतचे धडे देण्यात आले. या कार्यशाळेतून त्यांच्याकडून स्वच्छतेचे प्रबोधन संपूर्ण राज्यात करण्यासाठी युती शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या घरादारापासून प्रत्येकाने स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा स्वच्छतेचा आरसा संपूर्ण देशात गौरवाने अभिमानाने सर्वत्र खुलला पाहिजे.

इस्त्राईलच्या सहकार्याने व त्यांच्याकडील तंत्रज्ञानावर येथील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांचा स्वतंत्र कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार केला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, 60 लाख कुटूंबे आज उघड्यावर शौचविधीस बसतात. त्यातून स्वच्छता व आरोग्याचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. ग्रामीण भागातील माता भगिनी उघड्यावर शौचास बसू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येताच केंद्र व राज्य शासनाने शौचालयाचे अनुदान चार हजारांहून बारा हजार केले. त्याचा परिणाम म्हणजेच शौचालयांची संख्या वाढली आणि हगणदारीमुक्त गाव संकल्पनेला हातभार लागला.