पूरग्रस्तांना अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, प्रतिकुटुंब 5000 ‘कॅश’ आणि बाकीचे ‘बँक’ खात्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा, सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थिती निवळण्याचे नाव घेत नाहीये. आता पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी निर्देश दिले असून बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोख पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर बँक खात्यात जमा करण्यास सांगितले आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास विविध प्रकारचे निर्देश देत नागरिकांच्या आरोग्यासंबंधी जागरूक राहायला सांगितले आहे. गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा असेही सांगितले आहे.

असे सुरु आहे मदतकार्य
५३५आश्रय शिबीरांच्या माध्यमातून पूरग्रस्त जिल्ह्यांतून ४ लाख १३ हजार ९८५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. याठिकाणी वैद्यकीय मदतकार्य पुरवण्यासाठीदेखील मोठी व्यवस्था केलेली असून सांगली जिल्ह्यात ८०, कोल्हापूर जिल्ह्यात १५० आणि सातारा जिल्ह्यात ७२ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. प्रशासन वेगवान हालचाली करत आहे.

अजूनही वाहतूक ठप्प
सांगली जिल्ह्यात ६६ रस्ते वाहतूकीसाठी बंद असून ३३ पूल अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ९१ रस्ते वाहतूकीसाठी बंद असून ३९ पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात ५ रस्ते वाहतूकीसाठी बंद असून ३ पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात ३३ रस्ते बंद असून १४ पूल पाण्याखाली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त