विश्वासदर्शक ठरावात पुणे जिल्ह्यातील ‘हे’ आमदार ठरले ‘लकी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते.

राज्य सरकारने हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून पुणे जिल्ह्यातील आंबेगावचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केली होती. वळसे पाटील यांनी बहुमत ठरावावर काऊंटिंग व्होट घेण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानुसार ठरावासाठी अनुकुल असलेल्या आमदारांची शिरगणती करण्यात आली. यामध्ये प्रत्येक आमदाराने आपले नाव आणि अनुक्रमांक यावेळी सांगणे अनिवार्य असते.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप हे राज्य सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी सभागृहातील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी लकी आमदार ठरले. बहुमताचा जादुई आकड्याची बाँड्री असलेल्या 144 हा जगताप यांना अनुक्रमांक मिळाला. त्यामुळे ‘मी संजय जगताप 144’ असे उच्चारताच सरकारने विश्वसदर्शक ठराव जिंकल्याचे मत सभागृहाचे बनले.

यावेळी उपस्थित आमदारांनी जिंकल्याच्या आनंदात टाळ्यांचा कडकडाट केला. त्यामुळे संपूर्ण सभागृहाचे लक्ष आमदार जगताप यांच्याकडे गेले. तर पारनेचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लाखे यांनी ‘मी निलेश लंखे 145’ म्हणताच उद्धव ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

आवाजी मतदान घेऊन नंतर शिरगणतीद्वारेही मतदान घेण्यात आले. सरकारच्या बाजूनं बहुमत असल्याचं माहीत असलेल्या भाजपच्या सदस्यांनी मतदान सुरू होताच सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून सरकारच्या बाजूनं असलेल्या सदस्यांची गणती करण्यात आली. विश्वास ठरावाच्या बाजूनं १६९ मतं पडली आणि विरोधात शून्य मतं पडली.

Visit : Policenama.com