राज्यात गणेश विसर्जना दरम्यान १६ जण बुडाले, ११ जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्व भक्त भावनाविवश होत होते तर, दुसरीकडे राज्यभरात गणेश विसर्जन करताना अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्यामुळेही गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर दुःख पसरलेले आहे. करोनाच्या पार्श्वभूमी शांततेत गणरायाला निरोप दिला जात असतानाही राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज दिवसभरात एकूण 16 जण बुडाले. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच दोन तरुणांचा शोध सुरू आहे.

या ठिकाणी घडल्या दुर्दैवी घटना…

पुणे – गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याच्या खाणीत बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा मारुती लोकरे ( वय 18) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नाशिक – नाशिक जिल्ह्यातही गणेश विसर्जनावेळी पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघे जण नदीत आणि विहिरीत मृत्यू, तर एकाचा सेल्फी घेताना मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या व्यक्तींची पुढीलप्रमाणे… नरेश नागेश कोळी या युवकाचा देवळाली गावातील वालदेवी नदीत मृत्यू, संगमावर, दारणा नदीत अजिंक्य राजाराम गायधनी या युवकाचा मृत्यू, देवळा गावातील विहिरीत विसर्जन करताना प्रशांत वसंत गुंजाळ या युवकाचा बुडून मृत्यू, पिंपळगाव बसवंतला कादवा नदीत रवींद्र रामदास मोरे या युवकाचा बुडून मृत्यू, इगतपुरीला दरीच्या तोंडावर सेल्फी घेत असताना पाय घसरून पडल्यानं एकाचा मृत्यू

अकोला – नागझरी येथे दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

जळगाव – भुसावळ येथील तापी नदीत पाच तरुण बुडाले. स्थानिकांनी 5 जणांपैकी तिघा जणांना वाचवले दोन जणांचा शोध सुरू आहे. तसेच चोपडा तालुक्यातल्या विरवाडे येथंही दुर्घटना घडली. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघां भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.