महाराष्ट्राने ‘त्यांना’ शिक्षा दिली, जयंत पाटलांचा भाजपवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. भाजपने पक्ष फोडण्याचं जे काम केले, त्या मार्गाने आम्हाला जायचे नाही. कोणत्याही परिस्थिती सत्ता मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जसे प्रयत्न केले, त्याची शिक्षा महाराष्ट्राने त्यांना दिलेली आहे.

जयंत पाटील म्हणाले की खातेवाटप करण्याचा आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा करत आहेत, तेच योग्यवेळी निर्णय घेतील, यात कोणतीही अडचण नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार झालेला तुम्हाला दिसेल.

आमच्या पक्षात कोणाला यायचं असेल तर त्यावर रीतसर चर्चा केली जाईल. सरकार वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी आम्ही पक्षांतर कुठेही करु देणार नाही. परंतू स्थानिक पातळीर आमच्या पक्षात कोणाला यायचे असेल तर त्यांचे स्वागत करताना आम्ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पावले टाकू. आम्हाला जे सोडून गेले त्यातील अनेक जण आता अस्वस्थ आहेत, संपर्कात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. गडबडीत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही असे ही जयंत पाटलांनी स्पष्ट केले.

सध्या भाजपचे काही आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूकी अगोदर काँग्रेस – राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणाऱ्यांची घरवापसी होणार असे बोलले जात आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी टीका केली की भरती जेवढी मोठी ओहटी देखील तेवढीच मोठी हा तर नैसर्गिक नियम आहे. ओहटी सुरु झाली आहे असे सूचक व्यक्तव्य त्यांनी केले. भाजपमधील सक्षम नेतृत्व दुर्दैवाने दूर लोटले गेले. भाजपमधील जुन्या मंडळींची अस्वस्थता आम्हाला जाणवत असल्याचे थोरातांनी सांगितले.