‘महाराष्ट्राला चौकस गृहमंत्री अपेक्षित होता पण लाभला चौकशीकार गृहमंत्री’ – भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख, जितेंद्र आव्हाड या प्रकरणावरून भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात काही झाले तरी चौकशी करू, हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झाले आहे, महाराष्ट्राला खर तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात चौकशीकार गृहमंत्री लाभले आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही, ती प्रलंबितच राहते असा आरोप भाजपाने गृहमंत्री देशमुख यांच्यावर केला आहे.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ चौकशी करू असे बोलून क्लीनचिटच दिली. तसेच ज्या मंत्र्याच्या अनैतिक संबंधाने राज्यात गदारोळ माजवला. त्या धनंजय मुंडे यांचे प्रकरण देखील प्रलंबितच आहे. तसेच सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे. पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच सीरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ गृहमंत्र्यांनाच माहिती आहे, ही आग षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशीही प्रलंबितच असल्याचा चिमटाही भाजपाने देशमुखांना काढला आहे.