अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु ; राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपाल विद्यासागर राव यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. तसंच मला त्याचा अभिमान आहे, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर मात्र आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी विद्यासागर राव यांच्या त्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.


काही दिवसांपूर्वी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून असून मला त्याचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल म्हणून आजच्या अभिभाषणात ते राज्यातील जनतेच्या हिताची, कल्याणाची भूमिका मांडणार आहेत की, संघाचा कार्यकर्ता म्हणून अजेंडा राबवणार?  याबाबत विरोधी पक्षांच्या मनात संशय असल्याने आम्ही त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला, अशी बाजू धनंजय मुंडे यांनी मांडली.

राज्यपालांवरची नारजी असल्याने त्यांनी विधिमंडळात प्रवेश करताच विरोधकांनी ‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशी घोषणाबाजी केली. अधिवेशन पुढचे सहा दिवस चालणार आहे. यात विरोधक शेतकऱ्यांना कर्जमाफी, नोकरभरती, दुष्काळ आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.

दरम्यान, २०१४ मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादीने अभिभाषणावर बहिष्कार घातला होता. मात्र त्यानंतर आता दुसऱ्यांदा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.