अजित पवारांवर भाजपनं का विश्वास ठेवला ? अमित शहांनी दिलं उत्तर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर विश्वास का ठेवला? असा प्रश्न भाजपा नेत्यांना पडला आहे. याविषयी अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अमित शहा म्हणाले की, ‘अजित पवार हे राष्ट्रवादी आमदारांच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडलेले होते. त्यांना सरकार बनविण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते. राज्यपालांनीही सरकार बनविण्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने पहिल्यांदा सरकार बनविण्यास असमर्थता दाखविली त्या पत्रावरही अजित पवारांची स्वाक्षरी होती. आमच्याकडे पाठिंब्याचे जे पत्र आले त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी होती.’

अनेक प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झाली होती. आम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता. तसेच निवडणुकीवेळी आमची शिवसेनेसोबत युती झाली होती. दोन्ही पक्षांना एकमेकांच्या मतदारांनी मतदान केलं. आमच्या महायुतीला लोकांनी कौल दिला. जनादेश हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता असेही शहा म्हणाले आहेत. तसेच या या दरम्यान अजित पवारांवरील कोणतेही प्रकरणं मागे घेण्यात आलं नाही अशीही माहिती शहा यांनी दिली आहे.

अजित पवारांबद्दल योग्य वेळी प्रतिक्रिया देईन : देवेंद्र फडणवीस

भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनमा दिल्यानंतर उद्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. अजित पवार यांच्याबद्दल काहीही बोलण्यास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. ‘योग्य वेळी योग्य ते बोलेन,’ असे ते म्हणाले आहेत.

Visit : Policenama.com