सरकारविरुद्ध भाजपची ‘रणनीती’, शिवसनेच्या ‘या’ माजी दिग्गजाला विधान परिषदेत आणणार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काल राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री अखेर स्थित झाला. भाजपाने कंबर कसून प्रयत्न केले परंतु त्यांना विरोधी बाकावरच समाधान मानावे लागणार आहे. आता राज्यात स्थापन झालेल्या सरकारला घेरण्यासाठी भाजपानं रणनीती आखण्यास सुरुवात केली असून महाविकासआघाडीपुढे मोठे आव्हान भाजपाच्या रूपात उभे राहणार आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला करत शिवसेनेवर काल पहिला बाण सोडला. देवेंद्र फडणवीस भाजपाचे विधिमंडळातील गटनेते असल्यानं त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा असेल. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल. यासोबतच विधानपरिषदेतही शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे. भाजपाचे आव्हान पेलून पुढील पाच वर्ष शिवसेना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कशी निभावते हे पाहणे महत्वाचे आहे.

दरम्यान, भाजपाकडून शिवसेनेला सळो की पळो करणारा नेता भेटला असून शिवसेनेवर कायम तोंडसुख घेणारे आणि ठाकरे कुटुंबावर नेहमी तुटून पडणारे नारायण राणे यांना विधानपरिषदेत आणण्याच्या दृष्टीनं भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिल्लीतील भाजपा नेत्यांशी संपर्कदेखील साधण्यात आला आहे. मागील काळात नारायण राणे यांची ओळख कडवे शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे. परंतु नारायण राणे आता ठाकरे कुटुंबाचे कडवे टीकाकार मानले जातात.

नारायण राणे यांना शिवसेना मुळापासून परिचित आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही बाजू नारायण राणेंना माहित असल्याने शिवसेनेला घेरण्यासाठी त्यांना सोपे जाईल. भाजपाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त टीका राणे कुटुंबाकडून ठाकरेंवर केली जाते. त्यामुळेच त्यांना विधानपरिषदेत आणून शिवसेनेसमोर अडचणी निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न यशस्वी ठरणार का हे पहावे लागणार आहे.

विधानपरिषदेत मोठा चेहरा असणे महत्वाचे असते हे भाजपा जाणून असल्याने नारायण राणेंशिवाय दुसरा पर्याय होऊच शकत नाही. त्यामुळे भाजपामध्ये नारायण राणेंना विधानपरिषदेत आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच ठाकरे कुटुंबाविरुद्ध तोंडसुख घेणारे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून विजयी झाल्यानं ते विधानसभेत दिसतील. त्यामुळे शिवसेनेला अंगावर घेताना फडणवीस यांना नितेश राणेंची साथ मिळेल.

सध्या राणे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते विधानपरिषदेत आल्यास दोन्ही सभागृहांमध्ये सरकारची आणि विशेषत: शिवसेनेची कोंडी करता येऊ शकते, असं भाजपामधील नेत्यांना वाटतं. राणे विधानपरिषदेत आल्यास वारंवार ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. आता शिवसेना या सगळ्या संकटांना कशा पद्धतीने हाताळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com