पवारांनी सेनेला काँग्रेससोबत ‘जोडलं’ अन् तिघाडी सरकार जनतेच्या ‘बोकांडी’ बसवलं, भाजपच्या ‘या’ नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन : राज्यात सत्तांतराबाबत बऱ्याच घडामोडी घडल्या आणि शेवटपर्यंत कोण सरकार स्थापन करते हे सांगणे कठीण होते. अखेर महाविकास आघाडीची स्थापना होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे भाजपा ला विरोधी पक्षात बसून समाधान मानावे लागले. त्यामुळे आता भाजपाने महाविकास आघाडीवर विरुद्ध कठोर भूमिका घेत आक्रमक टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांच्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना अहम् नडला असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. पण खरी वस्तूस्थिती म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून शरद पवारांनी शिवसेनेला काँग्रेससोबत जोडून घेतले आहे. तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले आणि महायुतीला जनतेने कौल दिला होता त्या जनादेशाचा अपमान केला असा आरोप भाजपाने शरद पवारांवर केला असून महाविकास आघाडीला आता भाजपा कडून जोरदार टीकांना सामोरे जावे लागत आहे.

अतुल भातखळकर म्हणतात की, १०५ जागा मिळवणाऱ्या फडणवीसांना जनतेने नाकारलं आहे असं शरद पवार सांगतात, परंतु राष्ट्रवादीला जनतेने ५०-५५ जागा देऊन लाथाडलं असंच म्हणावं लागेल असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. तसेच मेट्रोसारखे लोकांना उपयुक्त असणारे प्रकल्प बंद करून मत्सालयाचा घाट घालणे ही म्हणजे तिघाडी सरकारची म्हणजेच महाविकास आघाडीची निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे. आज शहरामध्ये वाहतुकीच्या कारणांमुळे लोक वैतागले असून वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे बंद करा अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बजावले.

महाविकास आघाडी राज्यात भाजप या मोठया पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यास यशस्वी झाली आहे. यानंतर उद्धव ठकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांकडे मोर्चा वळवला आहे. भाजपाच्या कार्यकाळात आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाने गती घेतली होती परंतु शिवसेनेचा यास आधीपासून विरोध होता अखेर शिवसेनेने आपल्या हातात सत्ता आल्यावर लगोलग आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पुनर्विचार केला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी देखील त्यांच्या खास शैलीत फडणवीसांना चिमटा घेत म्हटले होते की, ‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता, त्याची त्यांना किंमत मोजावी लागली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. यावरच भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

Visit : Policenama.com