ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. तर 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंगळवारी (दि. 20) मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यंदा परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करावे याबाबत मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाल्याचे टोपे यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, या संदर्भात काही असेसमेंट घ्यायच्या असतील तर त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यात कठोर निर्बंध लागू करूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात यावा यावर मंत्रिमंडळात एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करणार असल्याचे समजते.