बाप्पा पावला ! सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच मिळणार कपात केलेला ‘त्या’ महिन्यातील पगार
नगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूलात घट झाल्याने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली होती. ही रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्याचे त्यावेळी जाहीर केलं होतं. आता गणेशोत्सवाच्या आधी ही रक्कम देऊन सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. पुढील महिन्यात जुलैचा पगार दिल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी मार्चच्या वेतनातील राहिलेली रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाव्य तूट आणि आगामी संकट लक्षात घेऊन सरकारने त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. अगोदर कपात केलेली रक्कम पुन्हा मिळणार नाही, असे वाटत असतानाच ती दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मार्च महिन्याचे एप्रिलमध्ये देण्यात आलेल्या वेतनातून ही कपात करण्यात आली होती. तेव्हापासून कपात झालेली रक्कम देण्याचे प्रलंबित होते.
मार्च महिन्याच्या पगारात कपात करताना पदनिहाय टक्केवारी ठरवण्यात आली होती. त्यानुसार उरलेली ही रक्कम देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची 60 टक्के, गट अ व ब अधिकारी वर्ग 50 टक्के तर उरलेल्या कर्मचाऱ्यांची 25 टक्के रक्कम कपात करण्यात आली होती. ही शिल्लक रक्कम आता गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे.
जुलै महिन्याचा पगार ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यातील ही रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये गणेशोत्तवापूर्वी जमा होणार आहे. याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांचे मार्चचे दुसऱ्या टप्प्यातील वेतन द्यावे असेही आदेशात म्हटले आहे.