Lockdown : राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवला; मात्र ‘या’ सवलती राहणार कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लॉकडाउन आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि. 27) राज्यातील ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाउन असणार असून, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार (chief Secretary Sanjay Kumar) यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी केला आहे. त्यामुळे 2020 या वर्षात लॉकडाउन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

राज्यात मिशन बिगिन अगेनअंतर्गत अनेक निर्बंध शिथिल केले होते. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल केला आहे. आतापर्यंत ज्या सवलती दिल्या आहेत, त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याबाबत 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी दिली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

You might also like