Lockdown in Maharashtra : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला; परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांना RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणं बंधनकारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने यापुर्वीच राज्यात सर्वत्र 15 मे पर्यंत कडक निर्बंध घातले होते. तरी देखील आढळून येणार्‍या कोरोनाच्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. त्यामुळं कुठलाही धोका न पत्कारता राज्य सरकारनं आणखी 15 दिवस म्हणजेच राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

देशात इतर ठिकाणी देखील कोरोनाची रूग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यातील रूग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाल्याचे पहावयास मिळाले असले तरी म्हणावे तेवढी रूग्ण संख्या घटलेली नाही. सध्या कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहे. काही ठिकाणी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई येथे कोरोनाचा प्रादुर्भाव अंशतः कमी झाला आहे. मात्र, अजुनही काही प्रमाणावर कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. सर्व गोष्टींचा विचार करून मंत्रिमंडळाने आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. तो आज जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारनं आणखी 16 दिवस म्हणजेच राज्यात 1 जून (सकाळी 7 वाजेपर्यंत) पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांना ‘आरटी-पीसीआर’चा (RT-PCR) निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणं बंधनकारक असणार आहे.