राजकारणात मोठी खळबळ ! भाजपचे 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होताना दिसून येत असताच राजकीय वर्तुळातून एक खळबजनक बातमी येत आहे. सत्तास्थापनेसाठी असमर्थ ठरल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे 7 आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असून त्यांनी अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सुत्रांची माहिती आहे.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी दोन आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असे या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचे कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मात्र सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे मग निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरु केल्याची माहिती मिळत आहे.

भाजपने सत्तास्थापनेस आपण असमर्थ असल्याचे सांगितल्यानंतर राज्यपालांकडून दुसऱ्या क्रमांकाच्या शिवसेनेना सत्तास्थापनेसाठी बोलावण्यात आले. यानंतर मुंबईत मोठ्या घडामोडी होत असून आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची हॉटेल ताजमध्ये भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला. या बैठकीमध्ये नेमके काय ठरले हे अद्याप समजू शकले नाही.

Visit : Policenama.com