महाराष्ट्र सरकार vs राज्यपाल : शिवसेनेनं भगत सिंह कोश्यारी यांच्यावर साधला ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात चांगलीच जुगलबंदी सुरू आहे. शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, भाजपाचे पोट दुखत आहे, म्हणून संविधानिक पदावर विराजमान व्यक्तीला बाळंतकळा होणे, हे गंभीर आहे.

शिवसेनेने सामनामध्ये लिहिले आहे की, राज्यपाल पदावर बसलेली ज्येष्ठ व्यक्ती आपल्या मर्यादा ओलांडून वागत असेल तर काय होते, याचा धडा देशातील सर्व राज्यपालांनी घेतला असेल. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने आंदोलन सुरू केले. त्या राजकीय आंदोलनात राज्यपालांनी सहभागी होण्याची गरज नव्हती.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले, राज्यातील बार आणि रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, परंतु प्रार्थनास्थळे का बंद आहेत? तुम्हाला मंदिरे बंद ठेवण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असे प्रश्न राज्यपालांनी विचारले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे धोतरच पकडले आणि राजभवन हादरवून गेले.

शिवसेनेचे म्हणणे आहे की, या प्रकरणात राज्यपालांनी आ बैल मुझे मार, सारखे वर्तन केले, परंतु हा बैल नाही वाघ आहे, ही गोष्ट ते कसे विसरले? मुख्य गोष्ट ही आहे की, या संपूर्ण ‘धुलाई’ प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे वस्त्रहरण झाले आहे. राज्यपालांच्या आधाराने महाराष्ट्र सरकारवर हल्ला करणे त्यांना महागात पडले आहे.

शिवसेनेने म्हटले की, रेस्टॉरन्ट उघडण्यात आली आहेत, परंतु पूर्णपणे नियमांचे पालन करून. देव-देवतांना बंद करून ठेवण्यात कुणालाही आनंद मिळत नाही; परंतु पुन्हा एकदा मंदिरांमध्ये गर्दी वाढली की, कोरोना संक्रमितांची गर्दीदेखील वाढेल, यावर देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

भाजपावर निशाणा साधताना शिवसेनेने म्हटले की, भाजपाला प्रार्थनास्थळं उघडायचीच असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे. हेच योग्य ठरेल. मंदिर किंवा अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळं का उघडली नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे का? असा प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे, असे दिसत नाही. देशातील अनेक प्रमुख मंदिरे बंद आहेत.

शिवसेनेने म्हटले की, राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी एक ही मारा लेकिन सॉलिड मारा! हे शिवतेज पाहून मंदिरातील देवांनी सुद्धा आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहचला असेल, तर ते राजभवनची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना परत बोलावतील.