राज्यात राष्ट्रपती राजवट लागू, पुढे काय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सगळी सत्ता केंद्राकडे जाते. सगळीच म्हणजे कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेची सत्ता संसदेकडे जाते. न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणी असते. तेव्हा नागरिकांचे मूलभूत अधिकार संकुचित केले जातात, तेही राष्ट्रपती राजवटीत होत नाहीत, असे बापट यांनी सांगितले.

तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु असताना सर्वच पक्षामध्ये एकमत झाले, तर पुन्हा राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाऊ शकते. त्यानंतर एकमत झालेले पक्ष बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करु शकतात. जर राष्ट्रपती राजवट चुकीच्या दिशेने लागली तर न्यायालयात दाद मागता येते. उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट चुकीची असल्याचे न्यायालयाने ठरवल्यानंतर तेथील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली होती. यासाठी ठोस कारण पाहिजे, असेही उल्हास बापट यांनी सांगितले.

 

Visit : Policenama.com