‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्यासाठी ‘गाईडलाईन’ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्या सरकारने सर्व सण साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केलं आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली असताना मुस्लिम बांधवांच्या बकरी ईदला देखील परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बकरी ईद बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बकरी ईद साजरी करण्यासाठी नवी गाईडलाईन जाहीर केली असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे.

घरातच बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कारणासाठी गर्दी करणं आपल्याला परवडणारं नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करावी, असं आवाहन ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यंदा वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

बकरी ईदसाठी गाईडलाईन
– बकरे खरेदी करा ऑनलाईन
– बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही
– कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये
– प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करुन घ्यावी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी
– काही एनजीओंनी याबाबत पुढाकार घेतला आहे. मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
– राहत्या घरीच बकरी ईदची नमाज अदा करावी