‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, अध्यादेश जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   निसर्ग चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात अनेकांना बेघर केलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. आता चक्रीवादळग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीबाबत 17 जूनला झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मदतीत वाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्याचा अध्यादेश बुधवारी (दि.24) जारी करण्यात आला आहे. SDRF आणि NDRF च्या अटी आणि निकषांमध्ये बदल करून राज्य सरकार आता आपल्या निधीतून ही मदत करणार आहे.

कशी असणार आहे वाढीव मदत

–  नैसर्गिक आपत्तामध्ये घरांचं पूर्णत:नुकसान झाल असल्यास घरगुती भांडी आणि वस्तूंच्या नुकसानासाठी आता 5 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

–  अंशत: पडझड झालेल्या म्हणजे किमान 15 टक्के नुकसान झालेल्या कुटुंबांना आता 6 हजार ऐवजी 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

  अंशत: पडझड परंतु किमान 25 टक्के नुकसान झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी नव्या निर्णयाने 25 हजार रुपये प्रति घर मदत देण्यात येणार आहे.

  अंशत: पडझड झालेल्या किमान 50 टक्के नुकसान झालेल्या कुटुंबांना नव्या निर्णयाने प्रति घर 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

–  त्यासोबतच पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी प्रचलित दरानुसार 95 हजार 100 रुपये मदत सखल भागात दिली जात होती. तसेच दुर्गम भागात 101900 रुपये मदत दिली जात होती. आता सरसकट दीड लाख रुपये प्रति घर इतकी करण्यात येणार आहे.
मत्स्य व्यावसिकांच्या मदतीत वाढ

–  बोटींची अंशत: दुरुस्ती करण्यासाठी 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत

  पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 25 हजार रुपये देण्यात येतील

  अंशत: बाधीत झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.