राष्ट्रवादीच्या ‘बेपत्ता’ आमदाराचा व्हिडिओ आला पण भूमिकेमुळे गोंधळाची परिस्थिती कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेवरून राजकीय भूकंप झाल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत गेलेले अनेक आमदार सध्या राष्ट्रवादीच्या गोटात येऊन आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचे वारंवार सांगत आहेत. कालपासून बेपत्ता झालेले राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलेल्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला आहे.

काय म्हणालेत आमदार दरोडा व्हिडीओमध्ये
शहापूरचे आमदार दौलत दरोडांनी थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. ‘मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, मी अतिशय सुरक्षित आहे. घड्याळ या निशाणीवर निवडून आल्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्न येत नाही. मी माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला मी बांधील आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माझी विनंती आहे,’ असं दरोडा यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार सध्या भाजपसोबत आहेत आणि शरद पवार हे भाजप विरोधात सरकार स्थापनेची तयारी करत आहेत. त्यामुळे दरोडा यांनी केलेल्या विधानांवरून नेमके त्यांचा पाठींबा कोणाला आहे यावरून संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते.

Visit : Policenama.com