महापालिकेच्या शाळेत लवकरच येणार ‘दिल्ली पॅटर्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच दर्जा उंचावण्यासाठी आता राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्र सरकार आता शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली पॅटर्न राबवणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली आहे. याबाबतचे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

सोमवारी मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान बोलताना दिल्लीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मॉडेल देशात चांगले असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात शिक्षण ही कायम सरकारची प्राथमिकता होती. वेगवेगळ्या उत्पन्न, समाज घटकापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवणे ही सरकारची प्राथमिकता असेल असे पवार म्हणाले. दिल्लीतल्या विकसित सरकारी शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा विकास करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सर्वप्रथम शिक्षणाचे हे दिल्ली मॉडेल मुंबईतील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातील इतर शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये करण्यात येणार आहे. दिल्लीतील शाळांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/