संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची चौकशी, मुंबई पोलिसांच्या अहवालानंतर राज्य सरकारचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी हप्तावसुलीचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आता चौकशीच्या फे-यात अडकणार आहेत. त्यांच्याविरोधात गृहविभागाने चौकशीचे आदेश जारी केले असून महासंचालक दर्जाचे पोलिस अधिकारी संजय पांडे सिंग यांची चौकशी करणार आहेत. नुकतेच मुंबई पोलिस दलाकडून याप्रकरणी एक अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला होता. त्याआधारावर चौकशीचे आदेश दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सचिन वाझेची नियुक्ती, पदभार, कार्यपद्धतींबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडून मागवण्यात आली होती. हा अहवाल नुकताच गृहविभागाला प्राप्त झाला आहे. त्यात वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत असलेल्या बैठकीत झाल्याचे नमूद केले होते. तसे आदेशही त्यांनी काढल्याचे या अहवालात नमूद केले आहे. तसेच वाझे थेट परमबीर सिंग यांच्या अधिनस्थ काम करायचा, असेही या अहवालात म्हटले आहे. निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्यास सूचना होत्या, मात्र वाझेंना कार्यकारी पद दिल्याने विरोध झाला होता. वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्यालाही तत्कालीन सहपोलिस आयुक्तांनी विरोध केला होता. तसेच सीआययूचे रिपोर्टिंग परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे. तसेच अवैध धंद्यांबाबतचे छापे, इतर कारवाईत वाझे पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर आता गृहविभागाने परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.