राज्यात दिवाळीसाठी गाइडलाइन्स जारी, ‘या’ आहेत महत्वाच्या सूचना

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनः – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ( Coronavirus) राज्यात यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे झाले. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही( Diwali festival) तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून (maharashtra-government) करण्यात आले आहे. त्यादृष्टीने सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना (Diwali Guidelines) जारी केल्या आहेत. त्यात दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने सहा सूचना केल्या आहेत. नागरिकांनी यंदा फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

1) राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे झाले. आता दिपावली सणही अन्य सण-उत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊन साधेपणाने साजरा करावा.

2) करोना संसर्गामुळे बंद केलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली झाली नाहीत. ही बाब ध्यानात घेऊन दिवाळी घरगुती स्वरूपातच साजरी करावी. उत्सव काळात विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे. म्हणजे करोना संक्रमण वाढणार नाही.

3) दिवाळीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या स्थितीत करोना बाधित रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा अधिकच त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यंदा फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.

4)दिवाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करू नये. असा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक अशा माध्यमांतून करावा.

5) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम-शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. या माध्यमातून करोना, मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. तेथेही लोकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता बाळगावी.

6) कोविड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.