शिवसेना आणि राष्ट्रवादी, ‘पत्त्यांचा क्लब’ ; राज ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतून शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील मिळाल्यामुळे लवकरच राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन होणार आहे. त्यासंबंधी आज मुंबईमध्ये तीनही पक्षांची एकत्रित बैठक पार पडणार आहे. काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे आता राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल हे निश्चित झाले आहे. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वर्तवलेले भविष्यवाणी खरी ठरणार आहे.

दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी एक भविष्यवाणी केली होती सध्या ती खरी होताना दिसतीय, राज ठाकरे नाशिकातील एका सभेत म्हणाले होते भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार. हा काय पत्त्यांचा क्लब आहे का ? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला, असं राज ठाकरे म्हणाले होते. ज्यावेळी शिवसेनेचे मंत्री आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, असं जाहीरपणे सांगत होते, त्यावेळी राज यांनी हे विधान केलं होतं.

राज्यात सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालाय. त्यामुळे सर्वात जास्त संख्याबळ असूनही भाजप विरोधी बाकावर बसणार हे सुद्धा निश्चित मानले जात आहे.त्यामुळे आता आघाडीसोबत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश आले तर तब्बल वीस वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात पुन्हा होईल. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे.

Visit : Policenama.com