आरोग्य मंत्री राजेश टोपेंची मोदी सरकारडे मागणी, म्हणाले – ‘आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज, तुम्ही ऑक्सिजनची गरज भागवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइऩ – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात ऑगस्ट महिन्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचा विचार करून राज्य सरकार कोरोना विरोधातील लढ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी उपाययोजना केल्या केल्या असून राज्यात सध्या 38 ऑक्सिजन प्लांटमधून 53 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. मात्र सध्या इतके ऑक्सिजन राज्याला पुरत नाही. राज्याला 1700 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असून केंद्राने त्याची पुर्तता करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना विरुद्धच्या उपाययोजना आणि राज्य सरकार करत असलेल्या कामाची माहिती टोपे यांनी यावेळी दिली. राज्यात आतापर्यंत 28 लाख नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. येत्या काळात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोनच लसी सध्या उपलब्ध होत असल्या तरी यात कोव्हॅक्सीनचा राज्यात तुटवडा आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीनच्या पुरवठ्याबाबतही केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीच्या दराबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लहान मुलांसाठी लागणाऱ्या तत्सम आरोग्य सुविधा, व्हेंटिलेटर्स, बेड्स यांची व्यवस्था करण्याचे काम राज्य सरकारने सुरु केल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.