ठाकरे सरकार मंत्र्याना राहण्यासाठी 18 मजली ‘टॉवर’ बांधण्याच्या तयारीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकार आपल्या मंत्र्यांसाठी 18 मजली निवासी टॉवर बांधण्याची योजना आखत आहे. हा टॉवर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या भूखंडावर बांधला जाऊ शकतो. हा भूखंड 2 हजार 584 चौरस मीटरचा असून त्यावर असलेला बंगला 105 वर्षे जुना आहे. या प्रकल्पाला 119 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या खर्चाला सचिवांच्या समितीने मान्यता दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या जागेवरील असलेला जूना बंगला पाडून त्या ठिकाणी नवीन टॉवर उभारण्यात येणार आहे. या टॉवरमध्ये 18 मंत्र्यांना घर देण्यात येणार आहेत. या टॉवरच्या बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ 10337.80 मीटर असणार आहे. प्रत्येक मंत्र्यांना मिळालेल्या मजल्यावर 574 चौरस मीटरचे घर मिळणार आहे. यामध्ये लिव्हिंग रुम, चार बेडरुम, किचन, ऑफिस, पाहुण्यांसाठी खास जागा, दोन स्टाफ रुम आणि इतर सुविधा असणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तसेच या टॉवरमध्ये भेटीसाठी आलेल्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी स्वतंत्र लिफ्ट असणार आहेत.

या टॉवरमध्ये राहणाऱ्या मंत्री आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तर पाहुण्यांसाठी आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्यांना येण्या-जाण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. सुत्रांनी सांगितले की, या प्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.