नारायण राणेंचा महाविकासआघाडीला ‘टोला’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने म्हणजेच महावीसाघाडीने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असं न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा कडून आमदारांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली असून महाविकासआघाडीच्या ‘आम्ही १६२’ यांना छेद देऊन विश्वासदर्शक ठराव कसा पास करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या अनुषंगाने भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असून, भाजपा नेते नारायण राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला आहे.

नारायण राणे म्हणाले की, राज्यातील सत्ता संघर्षात न्यायालयानं दिलेला निर्णय हा भाजपाविरोधात नाही. तसेच शिवसेनेवर आक्रमक टीका करत शिवसेनेला सुप्रीम कोर्ट म्हणजे संजय राऊत वाटतात काय?, तोंडाला येईल ते काहीही बोलतात. कायमचं विरोधी पक्षात राहून आनंद घ्या. शिवसेनेला संविधानाशी काही लेणं-देणं नाही. त्यांचा संसदीय परंपरा, घटना, नियम याच्याशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे शिवसेना काय म्हणते याची दखल कुणीही घेऊ नये, असंही नारायण राणे म्हणाले.

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर ते कधीच काँग्रेस बरोबर गेले नसते अशा भाषेत त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली. तसेच महाविकास आघाडीकडे १६२ आमदारांच्या असलेल्या यादीवर राणेंनी टीका केली आहे. ते म्हणाले, आम्हीही २०० आमदारांची यादी तयार करून देऊ, जर शिवसेनेकडे १६२ आमदार होते, तर मग राज्यपालांनी त्यांना जेव्हा सत्ता स्थापनेसाठी बोलावलं होतं, तेव्हा का घेऊन गेले नाहीत. कमीत कमी १४५ तरी घेऊन जायचे, १४५ नव्हते तर मग १६२ कुठून आणले, असाही प्रश्न राणेंनी उपस्थित करून शिवसेनेला धारेवर धरले.

तसेच हा सगळा प्रकार खूप वाईट असून बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर कधीही गेले नसते. तसेच सोनिया गांधीसुद्धा शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जातील, असं मला वाटत नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. विश्वासदर्शक ठरावाच्या संबंधी न्यायालयानं मार्गदर्शन केलं आहे किंवा तसे आदेश दिले आहेत.

विश्वासदर्शक ठराव कसा व्हावा तो हात वर करून व्हावा की गुप्त मतदानानं व्हावा, याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. गुप्त मतदान घेऊ नये, असं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. उद्या विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यावा, असं न्यायालयानं सांगितलं आहे. तसेच आपल्या पक्षाची बाजू मांडत त्यांनी आमचा कुठलाही पराभव झालेला नाही, त्यामुळे राजीनामा कसला द्यायचा?, असंही ते म्हणाले आणि भाजपाच पुन्हा सत्तेत येणार याचे संकेत दिले.

न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्या संध्याकाळी ५ नंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. आणि या ठरावानंतर भाजपा सरकार विजयी होईल, असा मला विश्वास आहे असे देखील त्यांनी सांगितले. अजित पवारांनी भाजपासोबत राहायचं की पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहायचं याचा निर्णय घ्यायचा आहे, याचं उत्तर तेच देऊ शकतील. अजित पवार घेतलेल्या निर्णयावर ठाम आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की उद्या जिंकणारच, असंही राणे म्हणाले आहेत. राणेंचा हा विश्वास कितपत सार्थकी लागू शकतो हे उद्या ५ वाजता कळणारच.

Visit : Policenama.com