मुंबईच्या डबेवाल्यांचे गृहस्वप्न होणार पूर्ण, मिळणार स्वत: चे हक्काचे घर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लाखो चाकरनाम्यांना वेळेत गरमागरम जेवण पोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची ख्याती जगभर पसरली आहे. या डबेवाल्यांचे गृहस्वप्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांच्या घराच्या मागणीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये डबेवाल्यांना त्यांचे हक्काचे घर देण्याचे आश्वासन देत संबंधीत विभागांना तसे निर्देश देण्यात आले.

मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून दिली आहे. अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मागील 130 वर्षापासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या मुंबईच्या डेबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक मुंबईत येत असतात.

तसेच अनेक अभ्यासक देखील मुंबईत येत असतात. त्यांना माहिती देण्यासाठी हक्काची जागा असायला पाहिजे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना डबेवाल्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे नमूद केले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीला मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.