मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरु; ‘याचा’ होतोय विचार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यानंतर आता रद्द झालेले हे आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार, आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याची हालचाल सुरु आहे. त्यात आज आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर या मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विरोधकांनी याच मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली. त्यानंतर आता मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने विशेष हालचाली सुरु केल्या आहेत. नव्याने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचा सल्ला प्रशासनाला देण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. त्यात नव्या मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांचे मागासलेपण सिद्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ मिळणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोग अवैध ठरवला होता. हा आयोग एकतर्फी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यावर सरकारच्या वकिलांना योग्य युक्तिवाद करता आला नव्हता. त्यामुळेच सरकारने नव्याने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.