आता नराधमांची खैर नाही, महाराष्ट्रात लवकरतच ‘दिशा’ कायदा लागू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातली महिलांवरील वाढते अत्याचार आणि हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. आंध्र प्रदेशातील दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. येत्या 29 फेब्रुवारीला दिशा कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन संपण्यापूर्वीच राज्यात दिशा कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दिशा कायद्याचा आराखडा पुढील तीन दिवसांत तयार करण्यात येणार असून 29 फेब्रुवारी पासून कायदा लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहमंत्री म्हणाले, महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्याच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गुन्ह्यातील आरोपींना तातडीने आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हा कायदा राज्यात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरुपात लागू होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या कायद्यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचे काम हा कायदा करेल.

काय आहे ‘दिशा कायदा’ ?
बलात्काऱ्याला कठोरात कठोर शिक्षा आणि ती सुद्धा 21 दिवसांत देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक 2019 आणले आहे. यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना मृत्यू दंडाची तरतूद आहे.