‘आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही’, राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देऊ असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देऊ. आधी शपथ घेऊ द्या मग सर्व आश्वासनं पूर्ण करू. आम्ही किमान समान कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर आलो आहोत. शपथ घ्यायला तुमची परवानगी द्या.” असंही त्यांनी म्हटलं. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही आपलं म्हणणं मांडलं. महाराष्ट्रात 80 टक्के स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी कायदा करू असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाविकासआघाडीचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम काय याची माहिती दिली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करत आहेत. यात अंतर्गत किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर होणाऱ्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. किमान समान कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही भरीव मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 10 रुपयांना थाळी आणि 1 रुपयात क्लिनिक अशा आश्वासनांचा शिवसेनेच्या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आला होता. हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठीही कार्यक्रमात घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तात्काळ मदत आणि पिकविमा या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Visit : Policenama.com