पनवेलमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘क्वारंटाईन’ सेंटरमध्ये CCTV आणि महिला पोलीस तैनात करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइ –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी सर्व राज्यातला आढावा घेण्यात आला. या बैठकिला आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रत्येक गावात आता कोविड दक्षता समित्या स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, महिला रुग्णांसाठी महिला पोलीस सुरक्षा तैनात करणार असून सेंटर्समध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पनवेल मधील घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या बैठकीत राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यात यापुढे लॉकडाऊनची वेळ न आणता टप्प्याटप्प्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत कसे होतील याकडे सरकारचा कल असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात आता जिल्हा स्तरावर जसे टास्क फोर्स आहेत तसेच आता डेथ ऑडिट कमिटी तयार करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक गावात कोविड दक्षता समिती स्थापन करणार असल्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.