Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटात दिलासादायक ! ‘सिटीस्कॅन’ चाचणी देखील होणार स्वस्त, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. येत्या सात दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

समिती नेमण्यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी देखील कोरोना इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारायचे दर तसेच खासगी प्रयोगशांनी आरटीपीसीआर रॅपिड अँण्टीजेन, अॅण्टीबॉडीज चाचण्यांसाठी आकारायचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. आता सिटीस्कॅन चाचण्यांबाबतही तसेच पाऊल उचलण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन सारख्या चाचण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत. आरोग्य विभागाने या तक्रारींची गंभीर दखल घेत सामान्य रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी सिटीस्कॅन चाचण्याचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ. अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असणार आहेत. तर आरोग्य संचालक हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये व एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन सात दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. यानंतर चाचण्यांचे दर निश्चित केले जाणार आहेत.