‘शिर्डी साईबाबाचं मंदिर चालू करावे ही माझीही भुमीका, पण…’, शिवसेनेच्या ‘या’ खासदारानं सांगितलं नेमकं कारण

नगरः पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डीचे साईबाबा मंदिर चालू करावे, ही भूमिका माझी देखील आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्याच्या संदर्भात दक्षता म्हणून मंदिर बंदचा निर्णय घेतला आहे. आता शिर्डीत करोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मंदिर चालू करण्याबाबत आपण विनंती करणार असल्याचे शिर्डीचे खासदार शिवसेना नेते सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

खासदार लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे शनिवारी नगरमध्ये लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आता सर्व राज्यात करोना संदर्भातील परिस्थिती कमी होते. पण मंदिर चालू केल्यानंतर पुन्हा रोगराई होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही दक्षता घेतली आहे. ‘मंदिरे उघडण्या संदर्भात केवळ एका मंदिराचा नाही, तर संपूर्ण राज्याचा विचार मुख्यमंत्री ठाकरे करीत आहेत.कोरोनाची संख्या कमी झाल्यानंतर लवकरात लवकर राज्यातील मंदिरे मुख्यमंत्री सुरु करतील अशी आशा आहे.

दरम्यान, भाजपच्या वतीने शिर्डी येथे नुकतेच मंदिर उघडण्याचे मागणीसाठी आंदोलन झाले होते. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेच्या हिंदुत्वावर शंका घेतली होती. त्यावर लोखंडे म्हणाले, शिवसेनेला हिंदुत्व चंद्रकांत पाटील यांनी सांगण्याची गरज नाही. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. मात्र केवळ लोकांच्या आरोग्याचा विचार करून मुख्यमंत्री यांनी मंदिराबाबतचा निर्णय घेतलाय. त्यात कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये.