‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे, महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना खानापूरमध्ये वेगळीच युती पाहायला मिळाली. राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला असून कोल्हापुरातल्या खानापुरात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात धक्का बसला आहे. या निकालावर बोलताना पाटील म्हणाले, एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं चक्क काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. मात्र तरीही शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला. त्यामुळे भाजपला आपली सत्ता गमवावी लागली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावामध्ये शिवसेनाप्रणित पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकून चंद्रकांत पाटलांनाच धक्का दिला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटानं सरशी साधली. हा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, खानापूरमधील ग्रामस्थांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘खानापूर माझं गाव आहे. ते माझ्या मतदारसंघात येत नाही. माझा मतदारसंघ कोथरुड आहे. पण तरीही खानापूरातील जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. खानापुरात आमचा काही दारूण पराभव झालेला नाही. ६ पैकी ३ जागा भाजपला मिळाल्या आहेत.

या जागा आम्ही २००-२०० च्या अंतरानं जिंकल्या आहेत. एक जागा आम्ही १७ मतांनी, तर दुसरी ६३ मतांनी आमच्या हातून गेली. अन्यथा निकाल ५-४ लागला असता. पण दोन जागा थोडक्यात हातून गेल्यानं निकाल ६-३ असा लागला,’ असं पाटील म्हणाले. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील असे त्यांनी विधान केलं आहे. तसेच तिथे आमची विजयी घोडदौड सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.